आयुष्याला पुरणाऱ्या दुर्गाबाई . . .

काही लेखक आपल्या आयष्यात दीपस्तंभासारखे कार्य करीत असतात. अशाच थोर मंडळीपैकी एक विदूषी दुर्गाबाई भागवत.काही लेखक आपल्या आयष्यात दीपस्तंभासारखे कार्य करीत असतात. अशाच थोर मंडळीपैकी एक विदूषी दुर्गाबाई भागवत. दुर्गाबाईंबद्दल काय बोलावे, मला वाटतं महाभारतात जसे भीष्म पितामह होऊन गेले तशाच मराठी साहित्यात दुर्गाबाई अजरामर होऊन गेल्या. काय तो अभ्यास ! किती तो व्यासंग ! अशा अफाट दुर्गाबाईंची एक प्रदीर्घ मुलाखत आहे या पुस्तकात. खरंतर मुलाखतरूपी हा संवाद आहे प्रतिभा रानडे आणि दुर्गाबाईंचा; पण एक वाचक म्हणून वाचता वाचता आपण सुद्धा त्या गप्पांमध्ये रमून जातो. जणूकाही दुर्गाबाई अगदी आपल्या समोर बसून बोलत आहेत आपल्या आजीसारख्या आणि आपण शाळकरी मुलासारखे तल्लीन होऊन ऐकतोय. इतका विलक्षण अनुभव असतो दुर्गाबाईना वाचण्याचा.

विचारवंतांवर, लेखकांवर कोणतीही बंधने आली की, विचार मरतो. विचार मेला, की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते. माणसाला विचार स्वातंत्र्य असावे. तो समस्त मानव जमातीचा मूलभूत हक्क आहे. मनुष्याने आपले विचार सातत्याने व्यक्त होणे गरजेचे आहे. विचारांच्या आदान प्रदानामुळे मानवी जीवनातील सुख लक्षात येते. बाईंनी नेहमीच भारतीय संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मिथ्थकथा आणि एकंदरीत स्रियांचे जीवन यावर अभ्यासपूर्ण संशोधन केले. भारतीय समाजातील मिथ्थकथांची निर्मिती आणि त्यामागील तत्कालीन सामाजिक योगदान माहितीपुर्ण ठरते. त्यानिमित्त बाई विठोबा - पदुबाईची तसेच जगन्नाथपुरीच्या लक्ष्मीची कथा सांगतात. भारतात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तांत्रिक पंथाबद्दलचे विवेचन देखील ज्ञानात भर टाकते. बाईंनी व्यासपर्व नामक पुस्तकात त्यांना भावलेल्या महाभारतातील काही व्यक्तिमत्त्वांचे चित्रण केले आहे. कृष्ण,अर्जुन,कर्ण, कुंती यांच्यासमवेत द्रैापदीचे वर्णन देखील आढळते. पण आजवर आपण मानत आलेल्या विचारांना छेद देत बाईंनी इथे द्रैापदीला कृष्णाची बहीण म्हणून न दाखवता तिला मैत्रीण म्हणून सादर केले आहे. बाईंच्या या धाडसाचे तत्कालीन साहित्यात पडसाद उमटणे अगदी साहजिकच होते पण तरीही बाईंनी आपला विचार बदलला नाही. जे चूक आहे ते चूकच अाहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच अाहे. आपल्या विचारांवरची निष्ठा बाईंनी कधीच सोडली नाही. तत्कालीन लेखक भाऊ पाध्येंच्या पुस्तकांवरुन बराच वादंग माजलेला असताना, बाईंनी त्यांच्या लिखाणाचे स्वागतच केले. एखादे चित्र, साहित्य जर चांगले असू शकते तर त्याचवेळी ते अश्लील देखील असू शकते. त्यामागचे असलेले संदर्भ कोणते यावरूनच त्याची अश्लीलता ठरवली जाऊ शकते.

भगवान गैातम बुद्धावर बाईंनी कित्येक पुस्तके लिहिली. बैाद्ध धर्मावर त्यांच्या इतके संशोधनपर लेखन क्वचितच कोणी केले असेल. त्या लिखाणाची ओझरती छटा हे पुस्तक वाचताना लक्षात येते. भगवान बुद्धांचा प्रवास राजपुत्रापासुन संन्यासी होण्यापर्यंत कसा झाला. हिंदु धर्मात आणि बैाद्ध धर्मात काय फरक आहेत. बैाद्ध धर्मातील स्रियांचे स्थान काय होते. अशा विविध विषयांवर बाई इथे विस्ताराने बोलतात. लेखकाला अनेक भावनिक, शारीरिक आव्हाने जगावी लागतात. बरं हे सारे सोसणे आपल्या दैनंदिन जगण्याचा एक भाग बनून घ्यावे लागते. इतरांच्या जगण्यात कोणताही अडथळा न बनता. आपले लेखनकार्य प्रामाणिकपणे चालु ठेवावे. इतक्या सोप्या शब्दांत बाईंनी लिखाणाबद्दलचे विचार मांडले आहेत. एखादी व्यक्ती किती कलासंपन्न असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत दुर्गाबाई. त्यांना भरतकामाची आवड होती. तसेच त्यांना पाककलेची उत्तम जाण होती. त्यांच्या निवडक पाककृतींचा समावेश असलेले "खमंग" नामक पुस्तक वाचकांमध्ये प्रसिद्ध आहे.

दुर्गाबाईंनी साहित्या बरोबरच सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. १९५६ साली राज्य तमाशा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून तमाशा कलावंतांच्या विस्थापित आयुष्याला संवेदनशीलतेने समजून त्यावर शक्य तितकी शासकीय मदत देण्याचे कार्य पार पाडले.

तत्कालीन सरकार दरबारी तमाशा कलावंत आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्रियांचे

सामाजिक पुनर्वसन करण्याकरिता आवश्यक

उपाययोजना कशी राबवता येईल. याचा एक अहवालच सादर केला. एक स्री लेखिका म्हणून असलेली संवेदनाशीलता बाई आयुष्यभर जगत राहिल्या आणि म्हणूनच त्यांचे विचार आजही तितकेच खरे आणि ताजेतवाने वाटतात.

आपल्या जवळच्या माणसांच्या मृत्यू बद्दल भावनिक होणाऱ्या दुर्गाबाई स्वतःच्या मृत्यू प्रति अतिशय तर्कनिष्ठ विचार मांडतात. आपल्या मृत्यू पश्चात कसलंही अवडंबर माजवू नये. किती तो थोर विचार! किती तो साधेपणा.

बाईंना वाटायचं, काही माणसं उगाच स्वतःच्या प्रेमात पडलेली असतात. अशा मंडळींना मेल्यावरही आपले कैातुक व्हावे. किंबहुना लोकांनी आयुष्यभर आपला जयजयकार करावा. यासाठीच सारा अट्टाहास सुरु असतो. परंतु बाईंना हा सारा प्रकार विचित्र वाटतो. आपल्या मागे का उगाच लोकांना त्रास देत बसायचे. उगाच शासकीय यंत्रणा, वेळ, पैसा खर्च करायचा. बाईंनी मृत्यूला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कसे ठेवले आहे. याचा प्रत्यय त्यांच्याच पुढील कवितेच्या ओळीत दिसून येतो.

‘आयुष्याची झाली रात। मनी तेवे अंतज्योंत।

भय गेले मरणाचे। कोंभ फुटले सुखाचे ।।

अवयवांचे बळ गेले। काय कुणाचे अडले ।

फुटले जीवनाला डोळे। सुख वेडे त्यात लोळे ||

मरणा तुझ्या स्वागतास। आत्मा माझा आहे सज्ज ।

पायघडी देहाची ती। घालुनी मी वाट पाही।

सुखवेडी मी जाहले। देहोपनिषद सिद्ध झाले॥”

- मंगेश रंजना रवींद्र32 views0 comments