आलोक - मराठी पुस्तक परिचय

//मराठी पुस्तक परिचय

आलोक / आसाराम लोमटे / शब्द प्रकाशन


आसाराम लोमटे हे नांव पुर्वी ऐकलं होतं. त्यांचा 'इडा पीडा टळो' हा कथासंग्रह माहित होता. तो वाचायची इच्छा होती. मागील वर्षी त्यांच्या 'आलोक' या कथासंग्रहास साहित्य अकादमीचं पारितोषक मिळालं. यांमुळे कदाचित 'आलोक' कडे मी 'इडा पीडा टळो' आधी वळलो असेल.आपण ज्या सामाजिक, भौतिक वातावरणात राहतो त्यापेक्षा वेगळ्या वातावरणाबद्दल आपल्याला कुठेतरी कुतुहल असते. माझ्याही मनात ते आलोक बद्दल होते.

आलोकमधील कथा या ग्रामीणकथा आहेत. परंतू ग्रामीण म्हंटल्यावर येणारी हिरवेगांर शेतं, नदी, पाटातून झुळू झुळू वाहणारं पाणी, गाय, गुरं, बैल आणि निवांत जीवन हे या कथांमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही.


आपलं जग वेगानं बदलतंय. हा बदल सर्वसमाज घटकांमध्ये घडून येतोय. ग्रामीणसमाजही याला अपवाद नाही. आसाराम लोमटे यांच्या या कथांमधून हा बदल आपल्याला अचूकपणे भेटतो. पण या बदला बरोबरच भेटत राहतात, आपलं स्वत्व धडपडून जपणारी माणसं!


लोमटे यांच्याकडे प्रतिभा आहे. त्यांची निवेदनशैली वाचकाला बांधून ठेवते. कथेची ठाशीव मांडणी वाचकाला मोहित करणारी आहे. योजलेल्या उपमा आणि रुपकं इतकी अस्सल आणि रेखीव आहेत की त्या लेखनाला चित्रमय बनवतात. वाचकाला निखळ आनंद देतात.

या कथांमध्ये सामाजिक धाग्यांबरोबर राजकिय धाग्यांची वीण जास्त दिसते. 'जीत' ही कथा एका खेडयातील राजकारणावर बेतलेली आहे. या कथेतील राजकीय घटना, निवडणुका, प्रचार, राजकीय षडयंत्र यांचं चित्रण अगदी बारीक आणि जवळून आलेलं आहे. आपण एखादा राजकीय चित्रपट पाहतो आहोत असं वाटण्याइतपत ते जिवंत आहे.

'खुंदळण' या कथेतही राजकारण हा धागा आहे. एका सामाजिक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याची राजकारणातील फरपट, त्याच्या राजकीय महत्वकांक्षा, राजकारणात राहून समाजकार्य करताना येणार्या मर्यादा, कर्जामुळे त्याला बदलावा लागलेला राजकीय संसार, आणि या सर्वातून त्याच्या स्वत्वाला होत असलेले डंख, त्याची होणारी घुसमट हे सर्व जिवंतपणे आपल्या समोर उभं राहतं.

'वळण' या कथेमध्ये एका लहान मुलीचा प्रतिकुल वातावरणातही शिकण्याचा ध्यास, तिच्या आई वडीलांचा काबाडकष्ट करुन तिला शिकवण्यासाठी चाललेला आटापिटा, आणि अगदी अनपेक्षितपणे त्या कुटुंबासमोर आलेलं संकट आणि मग संघर्ष. हे सर्व वाचताना आपण हेलावून जातो, डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.


या कथासंग्रहात एकुण ६ कथा आहेत. या कथांमधून लेखकाने मानवी भावभावना रंगवल्या आहेतच; पण त्याचबरोबर वेगाने बदलत चाललेला समाज, आपल्या दारापर्यंत आलेलं राजकरण, गलिच्छ राजकारणामध्ये बरबटत चाललेला समाज, आजही टिकून असलेला जातीय विद्वेष, वंचितांचं होत असलेलं शोषण आशा अनेक गोष्टींचं सशक्त दर्शन आपल्याला घडतं.


मानवी मूल्यांचा वैयक्तिक, कौटुंबिक, समाजिक, राजकीय या वेगवेगळ्या पातळ्यांवर चाललेला संघर्ष हे या कथांचं बीज आहे आणि या बिजावर जिवंतपणे फुलून आलेल्या या कथा आपली संवेदना आणि स्वत्व यांना जाग आणणार्या आहेत!


- भारत निलख​8 views0 comments