चांदणे तुझ्या स्मरणांचे

सूर्यास्ताच्या वेळी मी एका संपूर्ण शांत समुद्रावर एकटाच बसून 'भय इथले संपत नाही ऐकत राहतो, अगदी प्रत्येक वेळेला ही कविता मला माझा हात धरून तुझ्यात आत खोलवर कुठेतरी घेऊन जाते आणि मग मला तुझा तळ सापडेल की काय असं वाटत आणि क्षणात ती माझा हात सोडून देते मग मी पुन्हा हात-पाय मारतो आणि वरती येतो नाकातोंडात पाणी गेल्यासारखा, काय भयानक आहे रे तुझा खोलवर गेलेला तळ,पण तू का इतका खोलवर जगलास? प्रचंड गूढता तू तुझ्याच आजूबाजूला का पेरलीस?तुझ्या कवितेतून तू कायमच मला बेबंद जगणारा भासलास पण मग का इतका सस्पेन्स ठेवून जगलास?


दुःख,एकांत,नैराश्य, संध्याकाळ, ह्यांवरच का तू इतकं नितांत प्रेम केलंस? म्हणूनच आम्ही तुला 'दुःखाचा महाकवी'म्हणून संबोधतो.


तुझ्या कवितांचे अर्थ शोधणं मी आता बंद केलंय मला ते शोधायला आवडतात पण मला आता गुंतायची भीती वाटते म्हणूनच मी आता ते शोधत नाही, सापडलेच तर जपून मात्र ठेवतो पण ते सुद्धा प्रत्येक वेळी नवे नवे मिळत राहतात.


तुझ्या नावात 'माणकं,आणि आडनावात 'गोड'व्याच्या 'घाट' घातलेला असूनसुद्धा तुला ते पुसून 'ग्रेस' लावावं असं का वाटलं असेल?


ग्रेस अजूनही तुला तुझ्याच किनाऱ्यावरच्या तुझ्याच लाटा पहारेकरी वाटतात का रे?


संध्याकाळी मी गात असलो आणि गीतं शिकवायला तू आलास की तुझ्यावाटेवर चालायची खूप इच्छा होते सूर्य संपून संधीप्रकाशाची जागा काळोख घेतो पण 'सुनी सुनी मंदिरं भेटली' की मग आपल्याला नाही जमायचं हे म्हणून मी परत वळतो मग माझ्याच अंगणात धुरकटलेला कंदीलसुद्धा मग मला प्रचंड प्रकाश दाखवतो आणि तुझी नशा उतरवतो ग्रेस तुझं अनेकांना वेड लागत पण मला तुझं वेड लागण परवडणारं नाही म्हणून तुझी रोज संध्याकाळी नशाच बरी, रोज चढली की आता पुरे म्हणता येत, पण पुन्हा सूर्यास्ताच्या वेळी आज चालत रे म्हणून तुझी ओढ निर्माण होते हे. रोजच बर अगदी तुझ्या लाटांसारखं.


I am free but not available. कारण मला बाकी काही कळलं नाही, तरी तुझ्या दारावरच हे वाक्य मात्र कळलंय.


शेवटी त्यानेच झाडांपाशीच निजायचं असत ज्याला झाडांत पुन्हा उगवण्याची इच्छा असते.


विरेंद्र मधुरा

13 views0 comments