google.com, pub-8541545695382139, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

प्रत्येकाला भेटावा असा “पार्टनर”

वाचणे माणसाला नेहमीच प्रवाही बनवते. नवे विचार प्रदान करते. आपल्याला जगण्यासाठी जसे अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा असतात. तशीच एक महत्वाची गरज म्हणजे वाचन होय. मराठी वाचकांना ज्यांनी वाचनाची गोडी लावली अशा लेखकांमध्ये पुल, वपु, द.मा. मिराजदार, शंकर पाटील अशा मंडळींचा अग्रक्रम लागतो. अनेक वाचकांना पुस्तके वाचण्याची सवय या लेखक मंडळीनी सवय लावली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मला सुरुवातीला वपुंची पुस्तके खूपच भारी वाटायची. त्यांच्या सहज सोप्या भाषेतील कथा मनाचा ठाव घ्यायच्या. ७०-८० च्या दशकात लोकांना यांच्या लेखणीने वेड लावले होते. त्यांची “पार्टनर” नावाची छोटीशी कादंबरी मला आजही तितकीच प्रिय वाटते जितकी पहिल्यांदा वाचताना वाटली होती.


पार्टनर कथा आहे एका मध्यमवर्गीय मराठी तरुणाची. आपले साचेबद्ध आयुष्य जगणारा मराठी तरुण. ८-५ अशी नोकरी करणारा आणि खिशाला परवडतील तेवढीच स्वप्ने बघणारा. रोजच्या जगण्यातील कटकटींना वैतागलेला असताना त्याच्या आयुष्यात एक मैतर येतो. त्याच्या सुखात, त्याच्या दुःखात, त्याच्या हसण्यात, त्याच्या अडचणीमध्ये तो सहभागी होतो. त्या पार्टनरला काही नाव नाही. कारण त्याचे जगण्याचे तत्वज्ञान सांगते. असा हा मस्त कलंदर अवलिया म्हणतो,


आपल्याला खरं तर नावच नसतं

बारशाला नाव ठेवतात ते आपल्या देहाचं.


तो येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगत असतो. प्रपंचात अडकण्याची त्याची मुळीच इच्छा नाहीये. म्हणूनच तो एकटा आहे. पण त्याच्या आयुष्यात रोज नित्यनव्या तरुणींचा संग त्याला लाभत आला आहे. लग्न, संसार, मुलेबाळे याबाबत एकंदरीत त्याची मते जरा चाकोरीबाहेरची आहेत. पार्टनर म्हणतो,


कुणाचा तरी मुलगा होणे टाळता येत नाही

कुणाचा तरी बाप होणे टाळता येतं.


कथेच्या नायकाला हा पार्टनर आयुष्याच्या विविध वळणांवर मार्गदर्शन करत असतो. कधी राहण्याची सोय करून तर कधी मुलीला पहिल्यांदा भेटायला जाताना महागडा परफ्युम देऊन. आयुष्याला असे निखळ, निस्वार्थी प्रेम देणारे मित्र लाभले तर जगणे एक उत्सव होऊन जाते. असा पार्टनर प्रत्येकाला लाभावा.



दुःख, आनंद, जय पराजय, हसू आसू, जन्म मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेते. एवढंच काय ते नवीन. पुनःपुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरणं. जगण्याचे कितीतरी रंग या पुस्तकात मनाला नवा विचार देऊन जातात. आपण आयुष्यभर ज्यांना आपले म्हणून जपत असतो त्यापैकी खरंच किती नाती आपली असतात? कित्येकदा आपण केवळ उपचार म्हणून काही नाती निभावत असतो. पार्टनर तुम्हाला नात्यांकडे बघण्याची नवी दृष्टी देतो.

11 views1 comment
bottom of page