सिर्फ एक बंदा काफी है
नुकतीच आपण देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी केली. गेल्या ७५ वर्षात आपण अनेक क्षेत्रात समाधानकारक प्रगती केली. पण एका बाबतीत आपण आजही मागासलेले आहोत, बाबा महाराज लोकांच्या भोंदूगिरीमध्ये.
आधुनिकीकरणाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारतात आजही काही भोंदूगिरी करणारे बुवा महाराज राजरोसपणे मुलींचे लैंगिक शोषण करतात. धर्माच्या बुरख्याआड असे कित्येक आसाराम आपली वासना शमवण्यासाठी कळ्यांचा बळी घेतात. आसाराम बापूबद्दल, खरतर त्याच्या नावामागे बापू लावणे सुद्धा चुकीचे वाटते. कारण एका थोर बापूने देशाला एकात्मतेचा मंत्र दिला होता. तर असो, सध्या गाजत असलेला “सिर्फ एक बंदा काफी है” असाच सत्य घटनांवर आधारित आहेत.
काही सिनेमे आपल्याला मनातून हादरून टाकतात. माणूस म्हणून आपल्या अवतीभोवती वावरणारे कितीतरी लांडगे समोर आणतात. आसाराम, नारायण साई, रामपाल, राम रहीम, नित्यानंद असे कितीतरी ढोंगी बाबा आपला गोरखधंदा चालवत असतात. हा सिनेमा आपल्याला अशा बाबांच्या नीच मनोवृत्तीचे दर्शन घडवतो. भोळ्याभाबड्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आसारामसारखे हरामी बाबा कसे अल्पवयीन मुलींचे शोषण करतात. याचे दाहक चित्रण या सिनेमात दिसते. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून आपल्याला गुंतवून ठेवतो. एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि तिच्या न्यायासाठी लढणारा तिचा बाप. या संघर्षात त्यांची बाजू मांडणारे अॅड पीसी सोलंकी म्हणजेच मनोज वाजपेयी. मनोजच्या अभिनयाबाबत बोलायचे, त्याने केलेल्या आजवरच्या रोलपैकी सर्वोत्तम रोल म्हणावा लागेल.
आसारामच्या अटकेनंतर देशभर उठलेला गदारोळ. त्याच्या सुटकेसाठी देशातील बड्या वकिलांचे प्रयत्न. सिनेमात अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात जेव्हा सत्य हतबल होते. खटल्यातील साक्षीदार लोकांवर होणारे जीवघेणे हल्ले बघताना, सत्याची बाजू घेणाऱ्या लोकांना किती यातना सहन कराव्या लागतात. याचा प्रतत्य येतो. कोर्टरूम मधली प्रत्येक सुनावणी अंगावर काटा आणते. शेवटच्या सुनावणीवेळी मनोजचा उद्वेग बघून एकाचवेळी डोळ्यात अंगार, संताप, पाणी दाटते. आसाराम सारख्या रावणाला शासन देण्यासाठी सोलंकी वकिलांनी खूप दीर्घकालीन लढा दिला. त्या संयमाला, त्या संघर्षाला, त्या जिद्दीला मनापासून सलाम!
प्रत्येकाने जरूर बघावा असा सिनेमा.
