google.com, pub-8541545695382139, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

“होडी - डियर माऊली” काळजात रुतत जाणारी चित्रमय कविता

मराठीत काही मोजके दिग्दर्शक आहेत जे सातत्याने आपल्या कलाकृतींमध्ये प्रयोगशीलतेला वाव देत असतात. व्यावसायिक यशा-अपयशाच्या पलीकडे जाऊन आपल्या कलानिर्मितीचा ध्यास, आनंद पूर्ण करत असतात. नुकताच प्राईम वर प्रदर्शित झालेला होडी Dear Molly! असाच एक कलात्मक सिनेमा आहे. बाप मुलीच्या भावनिक नात्यावर हा सिनेमा भाष्य करतो. जर तुम्हाला कविता वाचायला आवडत असतील तर हा सिनेमा तुम्हाला मेजवानी ठरू शकतो. सिनेमाची सुरवात होते नदीच्या काठाशी, बाप आपल्या लहानशा मुली बरोबर कागदाची होडी सोडत असताना एक कविता म्हणतो. माऊली, नकाशावर कुणी रेघोट्या मारल्या...? कुणी आखल्या या देशांच्या सीमा..? कागदाच्या होड्यांना कुठे समजतात या सरहदी...? माऊली, पृथ्वीवर कुणी कवी गातो तर अख्ख्या जगावर मानवतेची ऊब पसरते, आणि कुण्या योध्याच्या घोड्याची टाप पडते तर शहारून थरारते मानवता. पुढच्या आयुष्यात एवढं करता आलं तर बघ, या पृथ्वीच्या नकाशावरच्या रेघोट्या पुसता आल्या तर बघ.




सिनेमाची कथा काय असू शकते याची एक हलकीशी कल्पना इथेच जाणवते. एक तरुण आपल्या संशोधन कार्यासाठी साता समुद्रा पार जाऊन काहीतरी करू इच्छित आहे. पण नियतीने त्याच्या पुढ्यात काहीतरी वेगळेच अकल्पित वाढून ठेवले आहे. एका बाजूला त्याचे मन आपल्या बायकोसाठी, मुलीसाठी तडफडत आहे तर दुसऱ्या बाजूला त्याला संशोधक म्हणून काहीतरी भव्यदिव करून नाव, पैसा, प्रतिष्ठा कमवायची आहे. अर्थात यामागे त्याची प्रामणिक भावना आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा इतकीच असते. पण परिस्थितीच्या समोर तो हतबल आहे. मनाच्या द्विधावस्थेला लांघून तो अखेरीस परदेशी रवाना होतो.

तिथून तो आपल्या लेकीशी पत्राद्वारे संवाद साधू लागतो. तो सारा पत्र संवाद विलक्षण आहे. दुर्दैवाने तो सारा संवाद एकतर्फी आहे. एक बाप आपल्या मुलीशी बोलतोय पण इथे त्या मुलीला उत्तरा दाखल काही बोलण्याची मुभा नाहीये. कारण बापाने मुलीला तशी अटच घातली आहे.


उद्याचा दिवस केंव्हा येतो..,?

भयानक अंधार सोसते रात्र, उद्याचा दिवस तेंव्हा येतो,

अशी एक एक रात्र काढत होतो मी...

उद्याचा दिवस काही तरी घेऊन येईल या आशेवर,

मला पुण्याला परत यावं लागलं होतं, सक्तीने,

काहीही करता येत नव्हतं, मी फक्त हताशपणे परिस्थिती पाहत होतो..

माझ्या आसपास वाया जात होत्या गोष्टी, ऊर्जा, वेळ.

गेलेले पैसे परत येतील.. गेलेले तारुण्य, गेलेला वेळ..?

ते जे गेले ते गेलं, ते कुठून परत मिळेल...?

तुटलेल्या गोष्टी जुळत नाही, तडे राहतात हे समजत होतं,

सगळं तुटत जाताना हतबलपणे पाहत राहिलो फक्त.

माझ्या आतल्या ताणाने घराचा ताबा घेतला,

अनिता आई दोघी त्यातून जात होत्या,

उसवत जाणारी विण धरून ठेवायला अनिता धडपडत होती,

आणि मी... मी हेखेखोर होतो, मला माझं धेय्य दिसत होतं.

त्यात काय एवढं...? असं एखाद्याला बाहेरून वाटेलही,

पण हे त्याच माणसाला जाणवत असतं ज्याच्या आत विस्तव ठणकत असतो.


संपूर्ण सिनेमाभर विविध संवाद मनाचा ठाव घेतात. ते संवाद संवाद उरत नाहीत तर पडद्यावर उमटलेल्या कविता वाटतात. मनभर झिरपत राहणाऱ्या कविता.


आभाळाचं झुंबर शहारतं, पाण्याचा थेंब वेगळा होतो,

सल तर राहत असेल ना...?

पानं निखळतात डहाळीवरून, देठ सोडून..

सल तर राहत असेल ना...?

कोण जिवंत इथं आहे माऊली...?

जिवंत फक्त निसर्ग आहे,

जमीन आणि आकाश जिवंत आहे,

ते जगतायेत, आपण फक्त त्यांच्या जगण्याचं माध्यम आहोत.

पेशी आहोत आपण, पेशी मरतात नव्या जन्मतात..

जिवंत फक्त निसर्ग आहे. काल नव्हतो आपण, उद्याही नसू,

काल झालेल्या चुका, येणाऱ्या काळापासून लपवून ठेवण्यात काय हशील आहे?


13 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page