गाइड मनाला स्पर्शून जाणारी प्रेमकहाणी!

Updated: Mar 4

सत्तरच्या दशकात प्रचंड गाजलेला गाइड सिनेमा तुम्ही नक्कीच बघितला असेल. त्यातील देव आनंद आणि वहिदा रेहमानचा सदाबहार अभिनय,सचिनदेव बर्मनदाचे श्रवणीय संगीत,गाण्यांवर वहीदाचे एखाद्या विजेसारखे नृत्य सारेच कसे भारी जमून आले होते.म्हणूनच सिनेमा आजही खास वाटतो. काही कलाकृती अजरामरच असतात. काळाच्या ओघात कधीच जुन्या होत नाहीत. असा सर्वांग सुंदर सिनेमा आर के नारायण यांच्या गाइड या कादंबरीवर बेतलेला होता. पण सिनेमाचा शेवट आणि कादंबरीचा शेवट जरा वेगळे आहेत. सिनेमाचा शेवट माहित होता पण कादंबरीचा शेवट काय असू शकतो याची उत्सुकता होती.दक्षिणेतील मालगुडी नामक गावात रेल्वे राजू नावाने प्रसिद्ध असलेला एक प्रवासी गाइड आणि त्याच्या आयुष्यात अचानक आलेली एक नर्तकी यांची कहाणी आहे गाइड. येणारा प्रत्येक दिवस मस्त मजेत जगणारा राजू आयुष्याप्रती कधीच गंभीर नसतो. येणाऱ्या प्रवाशांना गावाच्या सभोताली असलेली प्रेक्षणीय स्थळे दाखवत त्याची पुष्कळ कमाई होत असे. अश्या बेफिकीर राजूला एक दिवस मार्को आणि त्याची पत्नी रोझी भेटते. आणि तिथूनच सुरु होते एका भोगवादी राजूची कथा, जो पुढे जाऊन एक आध्यात्मिक स्वामी म्हणून प्रसिद्ध पावतो. इतके दिवस एका कैफात जगलेला राजू स्वामी कसा बनतो. रोझी एक विवाहित आहे हे सत्य माहीत असूनही तो तिच्या प्रेमात पडतो. तिला भावनिक आधार देत तिच्या नृत्याला पुन्हा नव्याने सुरू करण्याचे प्रोत्साहन देतो. रोझीच्या मनात बंडाची ठिणगी पेटवतो खरा पण तिच्या नवऱ्यासामोर तिची सारी स्वप्ने बेचिराख होतात.


मुळात तिच्या नवऱ्याला तिच्या कलगुणांबद्दल काहीच कदर नसते. त्याला जिवंत रासरसित बायकोपेक्षा जुन्या पुरण्या निर्जीव कातळांमध्ये रस असतो. अशा अरसिक माणसाला भले काय कौतुक असणार आपल्या बायकोचे. इकडे राजू आणि रोझीचे नाते सामाजिक नीती नियमांना ओलांडून केव्हाच पार झालेले असते. मार्को रोझीला मागे सोडून पुढील प्रवासाला निघून जातो. अशावेळी राजू तिला आधार देतो. तिच्यातील नर्तकीला जागे करून, तिच्या कलेला यशाच्या शिखरावार पोहचवतो. रोझी रोज नवनवीन शहरात कार्यक्रम करत अमाप माया जमा करत असते. राजुच्या मनात कुठेतरी रोझी विषयी मालकी हक्काची भावना निर्माण होत असते.


आपल्याशिवाय तिच्या भोवती कोणीच असू नये. तिच्या जवळपास देखील कोणी फिरकू नये असे राजूला सतत वाटत असते. रोझीच्या यशामध्ये निश्चितच राजूचे योगदान मोठे असते त्यामुळे त्याला असे वाटणे स्वाभाविकच असते. पण प्रेमाच्या नात्यातील विश्वास जेव्हा संपुष्टात येतो तेव्हा नात्याला आहोटी लागायला सुरवात होते. राजुच्या बाबतीत हेच घडायला लागते. रोझीवर प्रेम करता करता तो तिला गृहीत धरून परस्पर निर्णय घेऊ लागतो. पैशांची उधळपट्टी करतो, अखेरीस रोझीला या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. रोझी त्याला सोडून कायमची निघून जाते.

केलेल्या कृत्याबद्दल राजूला तुरुंगवासाची शिक्षा होते. तुरुंगवास संपून आल्यावर राजुपुढे मोठा प्रश्न पडलेला असतो, आता पुढे कुठे जायचे ? काय करायचे ? भूतकाळच्या कटू आठवणी त्याचा पिछा सोडत नसतात. असाच विचारमग्न अवस्थेत एका मंदिरात बसलेला असता एक गावकरी त्याला बघतो. पुढे तोच गावकरी ( वेलन ) राजूची नवी ओळख निर्माण करतो. राजुच्या चेहऱ्यावरील शांत भाव मुद्रा बघून गावातील भोळ्या लोकांना त्यामध्ये कोणीतरी महान हसती दिसू लागते. लोक त्याला देवत्व बहाल करतात. राजुचा कायापालट होतो. हळूहळू राजूलाही लोकांना काहीतरी उपदेशपर सांगायला आवडू लागते. आता राजू देखील स्वतःला स्वामी समजून वागत असतो. लोकांना राजुमध्ये दिव्य पुरुष दिसत असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्याना स्वामीच दूर करू शकतात असा भाबडा विश्वास वाटत असतो.


लोकांना उपदेश करण्यापर्यंत ठीक होते, पण गोष्ट जेव्हा उपोषणाला बसण्याची येते तेव्हा मात्र राजूची पंचायत होते. एकीकडे पोटातील भूक फारकाळ सहन करवत नाही तर दुसरीकडे लोकांच्या भल्यासाठी उपोषणाला बसणे जरुरीचे झालेले असते. शेवटी राजुचा बांध फुटतो आणि आपल्या आयुष्याची खरी कहाणी तो वेलनला ऐकवतो. राजूची कहाणी ऐकूनही राजूचे स्वामित्व तसूभरही कमी होत नाही. गावातील प्रत्येकासाठी स्वामी अजरामर होऊन जातो.


- मंगेश रवींद्र वंजारी.


Book written by R. K. Narayan Translated by Ulka Raut.

21 views0 comments