'कासव' चित्रपटाच्या निमित्ताने....

Updated: Apr 8

कासव हा चित्रपट कमळ पुरस्कार जिंकणारा पाचवा चित्रपट आहे. लेखिका, पटकथाकार सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. निर्माता म्हणून डाॅ. मोहन आगाशे यांच नाव पडद्यावर झळकते.


चित्रपटाची सुरूवातच मुळी समुद्राच्या लहरींनी होते. याच लहरी संपूर्ण चित्रपटभर आपल्याला दिसत असतात. आपली सोबत करत असतात. चित्रपटाचा नायक मानव आणि कासव या दोघांची समांतर कहानी समजून घेतांना आपण आपल्यालाच सापडत जातो.


"कासव संगोपन संरक्षण केंद्र " या चित्रपटाच्या निमित्ताने ही एक वेगळी चळवळ किंवा कार्य माहिती पडलं. कासवाची पिल्लं लहान असताना म्हणे मांसाहारी असतात आणि मोठी झाल्यावर शाकाहारी बनतात. असं दत्ता भाऊ म्हणजे मोहन आगाशे जानकी म्हणजे इरावती कर्वे ला सांगत असतात. ती पण या कासव संगोपन संरक्षणाच्या कार्यात त्यांना मदत करायला म्हणून विदेश सोडून कोकणात आलेली असते. कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लाला वाचवायचं. कासव फिमेल ज्या किना-यावर जन्मली असेल त्याच किना-यावर येऊन मुलांना जन्म देणार नंतर पाण्यात निघून जाणार हे ठरलेलं निसर्गाचं गणित. मग त्यात लूडबूड नको फक्त तिची मुलं पाण्यात जाईस्तोवर त्यांचं संरक्षण करायचं. मग माणसांच्या मुलांचं काय ? हाच प्रश्न जान्हवी मानव साठी केलेल्या प्रयत्नातून चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर मांडते आहे .मुलं चुकतात. त्यांना नैराश्य येतं. त्या नैराश्यातून विफलावस्था येते. पण मग पुढे काय ? खरा प्रश्न समोरच असतो. या परिस्थितीत त्यांना प्रेम, माया हवी असते. ती जर मिळाली नाही तर मुलं टोकाची भुमिका घेतात आणि मग आत्महत्या हा एकच पर्याय ते स्विकारतात. पण मग ही अवस्था का येत असावी ? तर याचे ठोस कारण नाहीच सांगता यायचे. इथे यदू म्हणजे किशोर कदम जानकी च्या नोकराची भुमिका करतो आहे म्हटल्यापेक्षा तो अगदी सर्वसामान्य व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतो आहे असं त्याच्या बोलण्यावरून जाणवत राहतं. मानव चं विक्षिप्त वागणं पाहून यदू जानकीला म्हणतो बाई यांचा एवढा लाड करू नका. याला सरळ करायचं असेल तर दोन कानाखाली ठेऊनच द्याव्या लागतील.भरभरून काम करायचं, जीवाला जीव लावायचा, खूप राबायचं , मग कशाला एकटं वाटतंय. एकटं बसलं की एकटंच वाटणार ना ? हेच शिकलोय आम्ही लहानपणापासून. पण हा पोरगा तर एकटाच बसतो अन् तंद्रीतच जगतो. मग त्याला काही सुचत नाही. हे ऐकून जानकी यदूला समजावते की हा मनाचा आजार आहे. जसा शरीराचा असतो तसाच मनाचाही आजार असतो. ही माणसं जगापासून अदृश्य व्हायला बघतात. जगापासून स्वतःला withdraw होऊन स्वतः चा कोष तयार करतात. त्याचवेळी यदू जानकीला याच औषधांवर ची गोळी आणून तिच्या हातात देत असतो. नवरा आणि मुलाने आपली वाट वेगळी बनवल्यावर ती एकटी पडते. तो एकांत तिला खायला उठतो म्हणून ती दत्ता भाऊ सोबत काम करण्यासाठी कोकणात येते आणि इथेच रमते. एकदा ती आणि यदू गाडीने जाताना तिला धाब्यावर मानव विफलावस्थेत दिसतो . हाताचं बॅडेंज सांगत असतं मानवने आत्महत्येचा प्रयत्न करून झालाय. जानकी त्याला आपल्या घरी घेऊन येते आणि तिच्या परीने जमेल तशी ती तिच्या डाॅक्टरांकरवी औषधोपचार आणि सोबत प्रेमाने समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते. पण मानव मात्र स्वत: तचं हरवला असतो. त्याला काहिही बरं वाटत नाही. काही करावसं वाटत नाही. ना जेवणं ना कुणाशी बोलणं. तो फक्त स्वरातून एक आर्त टाहो फोडत असतो. जो थेट आपल्याही हृदयाला जाऊन भिडतो. पण जानकी मात्र हे प्रकरण फार सयंमीतपणे आणि प्रेमाने हाताळते. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण मानवला मात्र त्याही परिस्थितीत कळत असतं का करताहेत ही लोकं खासकरून जानकी माझ्यासाठी एवढं ? मला मरू का देत नाही ? किंवा माझ्या परिस्थितीवर मला का सोडत नाहीत ? म्हणून तो बरेचदा चिडतो. पण तरिही सगळे त्याच्याशी घरच्या सदस्या प्रमाणे वागतात. त्याला प्रेम देतात. हवं नको ते बघतात. औषधोपचार सुरूच असतात. मग हळूहळू त्या कोकण भुमीत तो रूळायला लागतो. तिथल्या लोकांचा कामाचा झपाटा आणि रात्रीचा नाटकातील सहभाग त्याला एक प्रकारची ऊर्जा देत असतो. हे त्याचं त्याला जाणवायला लागतं.या चित्रपटातील लहान मुलगा परशू जेव्हा मानवला म्हणतो की, एकावेळी एकच काम करायचं. भजे खायचे तर भजेचं खायचे, चहा प्यायचा तर चहाच प्यायचा. दोन्ही एकाच वेळी कोंबलं तर ठसका लागतो. त्यावेळी आपण आपल्याच आत डोकावयाला लागतो. एवढंस पोरं ते ज्याला कुणीही नाही. एकटा राहून दोन पैसे हाॅटेल मध्ये काम करून कसेतरी मिळवतो. तरिही त्यातूनही एका परक्या म्हाता-या आजोबांला जगवू पाहतो. तो जीवन अनूभवावरून सहजपणे एवढं मोठं जगण्याचं तत्त्वज्ञान सांगून जातो आणि आपण अंतर्मुख होतो. हे तत्वज्ञान तो समुद्र किना-यावरील नावेत बसून सांगत असतो आणि सोबतीला जगण्याची दृष्टीही. परशू मानवला म्हणतो की, ती समुद्राच्या पलीकडे असलेली पवनचक्की बघ, या लाटा बघ येतात आणि जातात. हे सगळं पाहताना मला कंटाळा येत नाही. आनंद होत राहतो. पण मग मी येथून उठून गेलो की माझ्या लक्षात राहत नाही. मी कामात मग्न असतो. असं विसरायचं असतं. लक्षात ठेवायचं नसतं. हे वाक्य फार भाव खाऊन जातं. कोकणी भाषेतील हे संवाद त्या लहान मुलांच्या तोंडी फारच गोड वाटतात. मुळात कोकणी भाषाचं गोड आणि त्या गोड लहान मुलांच्या तोंडी आणखी गोड वाटते.


जानकीचं आपलं कासव संशोधन आणि संगोपणाचं काम सुरू असतं पण ती ब-याच प्रयत्नाने मानवच्या डायरीच्या सहाय्याने मानवच्या विद्यापिठाचा आणि नंतर त्याच्या आईचा शोध लावते. त्याची आई जानकीला दिल्लीवरून भेटायला येतेही. पण ती सावत्र आई असते. सावत्र असली तरी ती स्वभावाला खूप छान असते. ती आणि जानकी दोघीही सामंजस्याने मानवला पूर्णपणे बरा होईस्तोवर जानकी जवळ ठेवायचं म्हणून ठरवतात. मानवच्या त्या डायरी वरून कळतं की मानव प्रेमात असफल झाला आहे आणि घरी हक्काची आई नाही. बाप दुस-या आईचा झाला म्हणून त्याला हाॅस्टेलवर ठेवल्या गेलं होतं. या परिस्थितीचा त्याला सामना करता आला नाही आणि तो खोल खोल डोहात फसत गेला. अति सुखसुविधा, अतिआत्मविश्वास, सतत जिंकण्याची अभिलाषा, हार मान्य नसणं, जीवनात " का " नसणे या सगळ्या गोष्टी माणसाला गंडवतात. या सर्वांपेक्षा जगणं फक्त महत्वाचे आहे. हे ती कासवाची पिल्लं सांगून जातात, तो छोटा मुलगा सांगून जातो, यदू सांगून जातो नकळतपणे, कोकणी ग्रामस्थ सांगून जातात लोकनाट्यातून ..जगणे किती आवश्यक आहे हे या प्रतिकातून कळतं जातं. सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या तरी त्यावर मात करायला हवी ती फक्त आणि फक्त जगण्याने.


आयुष्यात या समुद्रासारख्या लहरी येत राहतील, जात राहतील. पण आपण तिथे अडकायचे नाही. पुढे पुढे जात राहायचं. एखादी हट्टी लहर आलीच मानव च्या आयुष्यासारखी तर तिलाच विचारायचं तुला वाटतं तेवढंच खरं आहे का ? ते आणि तेवढंच फक्त खरं आहे ? मग आपलीच आपल्याला उत्तरं शो़धता येतात.


"एक पल में आयें

पल में परायी

कहासें तू आयी रे

चिरक भरमायी रे"!


या चित्रपटातील गाण्यासारखा आपला आतला आवाज त्या भावनेकडे मग त्रयस्थपणे बघायला लागतो. नव्हे बघताच यायला हवे. त्या क्षणाशी आपल्याला सहजतेने संवाद साधता आला की मग सगळंच सुंदर भासू लागतं.जानकी म्हणते या मोबाईल मुळे एका क्लीकवर जग आहे. अनेक काॅन्टॅक्टस् मोबाईल मध्ये आहेत. पण तरिही माणूस एकटा झालाय. अबोल झालाय. किती खरंय नाही ? एका सर्वेक्षणानूसार

जगात सर्वात जास्त आत्महत्या कोणत्या कारणाने होत असतील तर त्या प्रेम या शब्दामुळे. हा अती पवित्र असा अडीच अक्षरी शब्द आपल्याच विचारांमुळे बदनाम होतोय. या शब्दाचं असणं तेवढंच किती काय काय देऊन जाते आणि आपण मात्र अपेक्षांच्या मागे धावत आपलं जगणं विसरतोय. हे कळायला आयुष्यात " का " असणे फार महत्वाचे आहे. हाच का " कासव" या चित्रपटात प्रतिकात्मक रूपात वावरत राहतो आणि चित्रपटानंतर आपण आपलेच आपल्याला सापडलेले असतो. जसा मानव स्वतःलाच सापडलाय या चित्रपटात... हा विषय इतक्या सुंदर रितीने मांडण्यासाठी, लिहिण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकठणकर यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत....अतिशय उत्तम विषय, अतिशय उत्तम मांडणी... संपूर्ण चित्रपटच उत्तम...

©वर्षा पतके थोटे, नागपूर

vpatke2606@gmail.com

+91 75584 19765


Watch kasav film on SonyLiv : Link


71 views0 comments