माधवराव एकंबीकर

Updated: Mar 24

आपल्या सर्वांमध्ये एक स्पार्क दडलेला असतो. गरज असते त्याला ओळखून ध्येयाच्या दिशाने सातत्याने वाटचाल करण्याची. त्या वाटचालीत तुम्हांला खूपदा मार्गदर्शक भेटत असतात. कारण सतत आपले मन आपल्याशी तळ्यात मळ्यात खेळत असते. अशावेळी गोंधळून गेलेल्या मनाला मार्ग गवसण्यासाठी मदत करतात ते मार्गदर्शक.
अशाच एका गोंधळलेल्या तरुणाची कथा आहे,

"माधवराव एकंबीकर"

वैभव नावाचा एकवीशीतला एक लातुरचा काॅलेज तरुण, इंजिनिअरिंगची दोन वर्षे फेल झालेला. त्याची ओळख एका साहित्य प्रेमी मित्राशी होते. त्यातुन त्याला आपल्या

स्वातंत्र्यसैनिक आजोबांबद्दल कादंबरी लिहण्याची कल्पना सुचते. त्याच्या लेखनकार्यासाठी त्याचा मित्र आणि इतिहासाचे प्राध्यापक त्याला पुस्तकरुपी मदत करु पाहतात. आपल्या आजोबांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे म्हणूनच त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून प्रशस्तीपत्रक दिलेले होते. असे त्याने बालपणापासून ऎकलेले असते. आपल्या आजोबांबद्दल माहिती जमा करत असता त्याच्या लक्षात येते, घरातील कोणीही आजोबांबद्दल बोलायला तयार नाही. यामागे नक्की काय कारणे असू शकतात. ते खरंच स्वातंत्र्यसैनिक होते का ? त्यांनी खरंच काही भव्य कामगिरी केली होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला तो बाहेर पडतो.

आणि एकेक धक्कादायक गोष्टी त्याच्या समोर यायला लागतात. एका आवरणाखाली सत्याचे किती पदर असू शकतात. आपण समजतो ते खरंच सत्य असते का? समोर आलेले सत्य तटस्थपणे स्वीकारून लिहताना किती जण प्रामाणिकपणे लिहतात. किंबहुना ते लिहण्याचे धैर्य शेवटपर्यंत किती जण निभवतात.


आजोबांचा खरा इतिहास वैभवला समजतो पण एक वेळ अशी येते जिथे त्याला आपले कुटुंब आणि समाजातील प्रतिष्ठा वगैरे गोष्टींचा विचार सतावीत असतो. त्यावेळी प्राध्यापक त्याला लेखक कोण असतो, लेखकाचे समाजाप्रती कार्य काय. अशा गोष्टींची जाणीव करुन देतात.


लातूरची भाषा कादंबरी रुपात पहिल्यांदाच वाचण्यात आली. तिच्या वेगळेपणामुळे वाचण्याची मजा आणखी वाढली. पहिल्या प्रकरणापासुन असलेली उत्सुकता शेवटपर्यंत खिळवुन ठेवते. नवोदित लेखकांनी आवर्जुन वाचावी अशी कादंबरी. एक उत्तम कलाकृती.मंगेश वंजारी


पुस्तक - माधवराव एकंबीकर

लेखक - विवेक कुलकर्णी.
15 views0 comments