मातृरूपेण - संस्थिता

Updated: Jan 27

जंगल सफारी ला मध्यंतरी पेंच (मध्यप्रदेश) मध्ये जाणे झाले. जंगला मध्ये 'राज्य' असते ते वाघाचे, वाघिणीचे किंवा सिंहाचे. पण सिंहाच्या जाती फार कमी झाल्यात आणि सिंहाचे अभयारण्य ठरलेली असतात. पण वाघ, वाघीण, बिबट्या, हत्ती आणि इतर छोटे प्राणी सरसकट बहुतांशी जंगलात सापडतात.जंगलातून फिरतांना जिप्सीतून निघालो. सोबत गाईड होता. थोड्या अंतरावर गेल्यावर गाईडने जिप्सी ड्राॅईव्हर ला हळूच आवाजात जिप्सी थांबवायला सांगितली. मी विचारणार होतेच की काय झाले ? तेवढ्यात तो हळू आवाजात सांगायला लागला बाघीन आनेवाली है । सिग्नल मिल गया । मी विचारातच पडले याला कुठे इथे सिग्नल दिसतोय ? तर म्हणाला आपने पेड पर बंदर की चिल्लाने की आवाज सुनी है ना ? और नीचे देखो हरिण जोरजोरसे भाग रहे है । यही सिग्नल है । जिथे झाडावर माकड असतात अगदी त्याच झाडाखाली किंवा त्याच्या आधाराने हरिण कळपाने राहतात म्हणजे एका प्राण्यांच्या आधाराने दुसरा प्राणी राहतो. झाडावरच्या माकडांना वाघ किंवा हिंस्त्र प्राणी दुरून येतांना दिसतो तेव्हा ते ओरडून बाकी प्राण्यांना सिग्नल देतात. जेव्हा वाघ किंवा हिंस्त्र प्राणी अगदी जवळपास असेल कुठे तर , हरिण पळून पळून सिग्नल देतात.


आम्ही ज्या जंगलात गेलो. तिथे दोन जंगल आहेत. एका जंगलात " पाडदेव फिमेल " ही वाघीण राहते. तर एका जंगलात " बाघिणनाला " ही वाघीण राहते. एकून अकराशे प्रकारचे औषधीयुक्त , सुगंधीयुक्त झाडांच्या अभयारण्यात या दोघी राण्या राहतात. दोघीही एकमेकींच्या क्षेत्रात जात नाहीत. घुसखोरी तर दुरची गोष्ट. जर का चुकून एखादी दुसरीच्या क्षेत्रात गेलीच तर हल्ला झाल्याशिवाय राहत नाही. तर आम्ही गेलो होतो वाघिणनाला या राणीच्या जंगलात. तिथे आम्हाला माकडांकरवी संदेश मिळालाच होता की राणी पधार रही है । मग काय बसलो अंग चोरून , चिळीचुप राणीची वाट पाहत. पण राणी काही आली नाही. दोन हत्ती मात्र फार जवळून भेटीला येऊन गेले आणि सांगावाही आणला की राणी म्हणे नाल्यावर पाणी पिते आहे. मग आमचे प्रस्थान त्या दिशेला सुरू झाले. पण नाल्याजवळ पोहचेपर्यंत राणी आपल्या महालात म्हणजे नैसर्गिक पणे तयार झालेल्या दगडाच्या 'केव्हज्' मध्ये निघून गेली होती. मग आम्ही जिप्सीचा मोर्चा वळवला तिच्या महालाकडे. ब-याच अंतरावरील जिप्सीच्या आवाजाने राणी बाहेर आली आणि लगेच आत गेली. आम्ही सगळे हळहळ करतचं होतो तर ती सारखी आतबाहेर फे-या मारू लागली होती. तेवढ्यात गाईड म्हणाला आपण निघायला हवं. थोड्या अंतरावर गेल्यावर गाईड म्हणाला वाघीण बाळंतीण झाली आहे. मुलांना त्रास होऊ नये म्हणून ती सांगत होती की तुम्ही येथून निघून जा. मी तर अवाक् झाले. आदीवासी लोकांना जंगलाची आणि प्राणी , पक्ष्यांची भाषा बखूबीने समजते. थोडं पुढे गेल्यावर एक वाघ दुरून दिसला. पूर्ण जंगलात एकच वाघ आपलं अधिपत्य राखून आहे. दोन्ही राण्यांशी संग हा एकटाच पठ्ठ्या करतो. पण राणीला मुलं झाली की , ती तिच्या बाळांना याच्या पासून फार सांभाळून ठेवते. तिला मुलं फार जबाबदारीने वागवावी लागतात. कारण वाघाला आपलं अधिपत्य संपुष्टात आलेलं चालणार नसतं. इथेही सत्तेसाठी राजकारण पाहून मला तर काय बोलावे सुचेना. लहान प्राण्यांच्या जीवावर मोठ्या प्राण्यांच जीवन अवलंबून असतं हे एम्.एस. सी ला लाईफ सायकल शिकतांना समजलं होतंच. पण प्राणीही स्वतःचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी खूर्चीच राजकारण करतात. हे ऐकून जरा वाईटही वाटलं. ही सगळी फरफट भोगतेय ती मादी वाघीण आणि ते ही आपल्या मुलांसाठी. हीच परिस्थिती प्रत्येक स्त्री आपल्या मुलांसाठी स्विकारते आहे.

निसर्गाने या सृष्टीची उत्पत्ती आणि भरभराट तिच्याकडे सोपवली म्हणून तिला कुठल्याही वंशात गेली तरी आपली जबाबदारी पार पाडायची आहेच. हे एकूणच स्त्री जातीतील जीवनाचं सार उमगलं. आपलं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी वाघ येणा-या नवीन पिढीला मारून खायलाही तयार होतो. यावरून सत्तालालसा ही जवळीकतेपेक्षा , प्रेमापेक्षा जवळची ठरते. या सृष्टीवर ही गोष्ट जर मुक्या प्राण्यांमध्ये घडते आहे तर ? माणसांमध्ये न घडावी तरच नवलं ? शेवटी मनुष्य जात ही प्राण्यांचेच अॅडाप्टेशन आहे. निसर्गाने नर - मादी या दोन जाती बनवल्या ख-या पण फक्त स्त्री कडे मातृशक्ती बहाल करून एकप्रकारचा नर जातीवर उपकारचं केलाय. आपल्याच रक्तामासाच्या गोळ्याला वाढवताना किती आणि काय काय हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. हे तिचं तिलाच माहित. हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे !! मला तर अगदी कायमच वाटतं. हीच मातृशक्ती निसर्गाने फक्त स्त्रीकडे न ठेवता अर्ध आयुष्य नराकडे आणि अर्ध आयुष्य मादीकडे ठेवली असती तर ? तर जाणिवांचा बाजार नसताच भरला. दोन्ही जातीमध्ये जाणिवांना जाणून घेण्याचे मन राहीले असते. पण निसर्ग ही इथे चुकला आहे का ? की स्त्री शक्तीची ही दैवी देणगी या सत्तालालसे पोटी दाबली जाते आहे ? मध्यतंरी विद्या बालन या अभिनेत्रीचा चित्रपट " शेरनी " पाहण्यात आला. सत्ता लालसेने भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत हे चित्रपट पाहतांना कळत जातं. पण चित्रपट पाहताना मग मनात असंख्य प्रश्नही निर्माण होतात की विश्वास तरी कोणावर ठेवायचा ? फाॅरेष्ट मधली नोकरी करतांना एका स्त्रीला किती कठीणतेचा सामना करावा लागतो. पण शेरनी चित्रपटातील ते स्त्री पात्र अगदी पुरूषालाही लाजवेल अशी आपली नोकरीतली छाप बाकी कर्मचा-यावर पाडत राहते. रात्री - बेरात्री जंगलाचा फेरफटका असो की गावक-यांच्या समस्या असो ! एक स्त्री म्हणून कुठेही सहानुभुती न घेता आपली इमानेइतबारे नोकरी करताना तिच्या लक्षात येतं की कुठेतरी , काहीतरी गडबड आहे. तेव्हा ती निराश होते तरीही आपल्या परीने आपली नोकरी करत असते. पण या काळात तिला मानसिक आधार देतो तो तिचा मित्र वजा वरिष्ठ अधिकारी. पण जो व्यक्ती नोकरीमध्ये मित्र म्हणून आश्वस्थ करत राहतो आणि खोटा चेहरा खरा म्हणून दाखवत राहतो. तो सुद्धा भ्रष्टाचारा सारख्या गुंत्यात गुंतला आहे हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती मनाने खचते. पण तरिही ती शेरनी असते. तिच्या परीने ती बदल घडवू पाहते. पण तिच्या कामाचा रोख आणि सत्यापर्यंत पोहचण्याची तगमग बघून एका रात्रीतून तिची बदली फाॅरेष्ट खात्यातून डायरेक्ट प्राणीसंग्रहालयात होते. याचा अर्थ काय तर स्त्री शक्तीला लगाम घालता आला नाही किंवा येत नव्हता म्हणून तिला कैद करायचं. किती हा अन्याय. जगाला एक स्त्री देवी म्हणून चालते. देवीरूपात तिच्यातली भस्मासुराला संपवण्याची शक्ती चालते. पण जित्या - जागत्या रणरागिनी का चालत नसाव्यात ? इथेही स्त्री - पुरूष जातीतील सत्ता राजकारण आडवं येतं. अगदी हाच नियम वाघ आणि वाघिणीच्या बाबतीतही लागू होतो. हा असमतोलपणा निसर्गाने तरी का केला असावा बरं !! जिथे स्त्री कडे मातृत्व वरदान दिलंच आहे. तिथे मातृत्वाच्या कळा समस्त पुरूष जातीकडे सुपूर्द केल्या असत्या तर ? कदाचीत सत्तालालसेपेक्षा एक जीवन मग ते पशु- पक्ष्याचं असो, प्राणिमात्राचं असो की मनुष्य प्राण्याचं असो सरस ठरलं असतं असं मला मनोमन वाटतं. तेव्हा ख-या अर्थाने प्रत्येक सजीवाच्या नजरेत स्त्री शक्तीचा , मातृशक्तीचा जागर साजरा झाला असता. ©वर्षा पतके थोटे

vpatke2606@gmail.com

53 views0 comments