नविन बुक गॅलरीची बातमी

अरे, सोनु चल खाऊन घे पटकन

आज जायचं नाही का शाळेत ?

नको गं मम्मी, नको आज मला कंटाळा आलाय

नाही रे माझ्या सोन्या, शहाणी मुलं अशी कंटाळा नाही करत शाळेचा. चल उरक पटकन

हे बघ तुझी गाडी पण आली.

आपल्या लाडक्याला गाडीत बसवून, ती परत आपल्या कामात गुंग झाली.आज यांना काय देऊ डब्याला असा विचार करत तिने भेंडी कापायला घेतली.

आज मस्त भरली भेंडी देऊयात.

अगं, निघतोय मी. डबा देतेस का.

हो आलेच एक मिनिट , तिनं घाईघाईनं डबा भरून बॅगेत भरला.


हुश्श ! संपली एकदाची सकाळची कामे.

चहाचा कप हाती घेऊन ती वर्तमानपत्र वाचु लागली. बलात्कार, खुन दरोडे अपघात घोटाळॆ

अशा नेहमीच्या बातम्या तिला आताशा सवयीच्या झाल्या होत्या.

तिचे लक्ष वेधून घेतले शहरात सुरु होणाऱ्या नविन बुक गॅलरीच्या बातमीने. तिच्या चेहऱ्यावर हसु खुलून आले.

तिच्या घरापासून जवळच बुक गॅलरी सुरु होणार हे वाचून तिला खुप आनंद वाटला.

तशी तिला लग्नाच्या आधीपासुनच वाचनाची फार आवड. शाळा काॅलेजमध्ये ती आवडीने पुस्तके वाचायची. तिच्या माहेरी तिला तेवढी मोकळीक होती. पण लग्नानंतर सारेच बदलून गेले. तिच्या इच्छांवर सासरचे कुंपण आले.

तिचा नवरा खुपच कडक स्वभावाचा माणूस. त्याने तर ताकीद देऊन ठेवली, घराबाहेर पाऊल टाकायचा नाही. डोक्यावर कायम पदर पाहिजे आणि हे असले पुस्तके वगैरे वाचण्याचे थिल्लर छंद विसरून जायचे. आता तु एका प्रतिष्ठित घराण्याची सुन आहेस. याची जाणीव ठेऊन तुझे वागणे असायला हवे.


नवऱ्याच्या अशा तिखट शब्दांनी तिच्या डोळ्यांत पाणी आले. पण तिच्या डोळ्यांतले तळे बघायला तो तिथे होताच कुठे.

पुढे तिच्या संसारवेलीवर मुलं झाली. जगण्याच्या रहाटगाड्यात आवडीचे छंद ती विसरून गेली.

वाचनाची आवड मनात कुठेतरी लुप्त होऊन बसली.

आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.


सुनिताताई देशपांडे, दुर्गाबाई भागवत,गैारी देशपांडे, व.पु काळे, सानिया,जी ए कुलकर्णी अशी असंख्य नावे तिच्या डोळ्यांसमोर रिंगण घालू लागली. तिच्या मनाच्या भावविश्वाला साहित्या बद्दलची ओढ खुप जुनी होती. पण घरच्या शिस्तीमुळे तिला रोज आपल्या इच्छांना मुरड घालून जोखडात जगायची सवय लागली होती.


संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे दिवाबत्ती करायला सरसावली. दोन घटका मुलांशी खेळत बसली.

रात्री जेवणावळी नंतर, लाडिकपणे नवऱ्याला म्हणाली,

आहो, ऎकलेत का.

आपल्या इथे बुक गॅलरी सुरु होतेय.

आपण जाउयात का एकदा,

वाक्य बोलून एक मिनिट सरला, सारे वातावरण शांत

तिला भिती वाटली, आपण उगाच भलतेच बोलून बसलो कि काय काहीतरी,

हो जाऊयात कि

तु वाचन सुरु कर पुन्हा

मी देईन तुला पुस्तके आणुन वरचेवर

आय्या खरंच

आणि मनातला आनंद तिच्या गालांना स्पर्श करून बोलू लागला.

तिच्या अवकाशात आज लख्ख चांदणे पडले होते.


- मंगेश रवींद्र वंजारी.

8 views0 comments