फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

//मराठी पुस्तक परिचय

फिनिक्सच्याराखेतूनउठला मोर / जयंत पवार / लोकवाड्मय गृह


फिनिक्स नावाचा पक्षी राखेतून पुन्हा निर्माण होतो अशी एक अख्यायिका आहे. इथे फिनिक्सच्या राखेतून मोर उठतोय, कारण फिनिक्स हे बंद पडलेल्या सूतगिरणीचं नाव आहे तर मोर ही उपमा त्या जागी सुरू झालेल्या रंगेबीरंगी झगझगीत चकचकीत मॉलसाठी वापरली आहे.हा कथासंग्रह म्हणजे एखाद्या क्राईम रिपोर्टरने विध्वंस झालेल्या घटनास्थळाचा फोटो काढून त्याला सुंदर रंगीत फ्रेम करुन तो भिंतीवर लावल्यासारखं आहे!


सर्व कथांचं कथानक हे मुंबई या मायानगरीतलं आहे. नाहीरे वर्गाच्या जळजळीत वास्तवाच्या या कथा आहेत.

जागतिकीकरण, भांडवलशाही आणि धर्मजातीभेदाच्या अजस्त्र धुडांखाली चिरडला जाणारा नाहीरे वर्ग याचं दर्शन या कथांमधून होतं.


या कथा गिरणी कामगार, दलित, शोषित, वेश्या, बारगर्ल यांची आयुष्य आरपार मांडतात.

आहेरे वर्गाचा वर्चस्ववाद, नाहीरे वर्गाबद्दलची त्यांची मानसिकता आणि वर्तन, जागतिकीकरण आणि भांडवलशाहीच्या चक्रीवादळात आधीच दरिद्री असलेल्या समाजघटकांचं देशोधडीला लागणं आपल्या समोर येतं.

भारतीय समाजाची पोकळ मूल्यनिष्ठा, दुटप्पीपणा, असंवेदनशीलता लेखक सहजपणे उघडी पाडतो.


या कथांमधील आपल्या समाजाचं उघडं नागडं चित्र वाचकाला चटका देणारं आहे. काही कथांमधील ब्लॅक ह्युमर मुळे हा चटका आणखी तीव्र होतो.


पात्रांची बोलीभाषा, संवाद आणि कथानकातील नाट्य यांमुळे कथा वाचताना वाचक त्यात गुंतून जातो. पात्रांच्या भावनिक विश्वाचं चित्रण उत्तम झालं आहे.

या कथा दुःखं मांडणार्या असल्या तरी कोणत्याही कथेत दुःखाचं उदात्तीकरण नाही. दुःखाला काव्यात्मक बनवून कोणताही आव आणणं नाही.


'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा कथासंग्रह म्हणजे २१ व्या शतकातील भारतीय समाजाचं, त्याच्या भावना, मन आणि आयुष्याचं एक वेगळ्या प्रकारचं डॉक्यूमेंटेशन आहे!


- भारत निलख​

15 views0 comments