उदकाचिया आर्ती

Updated: Mar 24

मराठी कथाविश्वातील एक मोठे नाव मिलिंद बोकील. यापूर्वी त्यांची "समुद्र" नामक छोटेखानी कादंबरी वाचली होती.वाचल्यानंतर कित्येक दिवस शून्यात हरवलो होतो. मनात काहीतरी हललं होतं. स्वतःच्या पुरूषी अहंपणावर नकळत प्रतिप्रश्न उभे ठाकले होते. अाणि त्या दिवसापासून बोकील सरांची सारीच ग्रंथ संपदा वाचून काढायचे ठरवले. केवळ अफाट लिहितो हा माणूस. वाचता वाचता तुम्हाला थक्क करुन जातो.

"उदकाचिया आर्ती" दिवाळी अंकातील काही गाजलेल्या कथांचा कथासंग्रह. प्रत्येक कथेत कोणत्यातरी ध्येयाने प्रेरित झालेला कार्यकर्ता भेटतो. त्यांच्या कथांमध्ये नेहमीच चळवळीची पार्श्वभूमी असते. त्यामागे सरांची असलेली शोषित समूहाबद्दलची कळकळ दिसते. त्यातुन आलेला व्यापक करुणेचा रंग आपल्या काळजाचा ठाव घेतो. इथे कथा फक्त चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या नाहीत तर कधी कधी व्यक्तीगत कोंडीत सापडलेली काही भली माणसं भेटतात. त्यांची अगतिक अवस्था बघून नक्कीच आपले मन द्रवते. "भावी इतिहास" मधला शशिकांत वाचत असताना तुम्हांला नक्कीच ७०-८० च्या दशकातील ग्रामीण भागातला सामाजिक कार्यकर्ता आठवेल. समाजसेवेचे व्रत घेतलेला शशिकांत गावातील शेत मजुरांसाठी लढा देत असतो. गावागावातून मोर्चे काढत असतो. संपूर्ण क्रांती अब नारा है भावी इतिहास हमारा है हर जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून तो मनात कुठेतरी नाराज असतो. अचानक त्याला भूतकाळाची साद येते. त्याचे जुने लढे, त्याची जुनी भाषणे, त्याची जुनी मैत्रिण, ते सोनेरी जुने दिवस आठवतात. आणि क्षणभर का होईना त्याचे उदास मन हुरळून जाते. एकीकडे सामाजिक चळवळ सांभाळत असताना आपले संसाराकडे दुर्लक्ष झाले आहे, याची बोचरी जाणीव त्याला मध्येच सलत असते. तरीही मनातील भावनांना आवर घालून तो आपले सामाजिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता. अशी ध्येयवादी माणसं भेटतात बोकील सरांच्या कथांमध्ये. दुसरी कथा आहे "दुपार". माणसं प्रेमात आकंठ बुडतात मग लग्न करतात. सुरवातीला हवाहवासा वाटणारा सहवास कालांतराने दोघांपैकी कोणालातरी नकोसा वाटायला लागतो आणि मग सुरु होतो एक निरस प्रवास. सावित्री अशीच एक संसारी स्त्री. पण चार भितींच्या पलीकडील जग तिला खुणावत असते. सामाजिक आणि राजकीय चळवळींचे तिला आकर्षण असते. दोघा पतिपत्नींच्या महत्वाकांक्षेने एका संसाराची सांगता घटस्फोटात होते. "भूमी" नामक कथेत आपल्याला भेटतात जर्मन देशातून आलेले आणि महाराष्ट्रात राहून समाजकार्य करणारे फादर. नुकतेच त्यांना देश सोडण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.निःस्वार्थी मनाने करत असलेले समाजकार्य असे अचानक थांबवून पुन्हा आपल्या देशात जाण्याची प्रक्रिया वाचत असता आपले मन हेलावुन टाकते. महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जिथे स्वातंत्र्यानंतरही बहुजन समाजाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हाच पाण्याचा संघर्ष या कथेत आपले मन पिळवटून टाकतो. गावातील धनदांडगे लोक कशा प्रकारे फादरच्या कामात अडथळे आणतात, त्यांच्या बद्दल खोटे आरोप करुन सरकार दरबारी कशी त्यांची बदनामी करतात. इतके सारे होऊनही फादर स्थितप्रज्ञपणे सारे बघत आपली परतीची वाट धरतात. पुन्हा एक नवा गाव वसवाया. विदेशात स्थायिक झालेल्या चंद्रशेखर आणि सीमाची कथा आहे "विदेश". अवघ्या पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. एका मध्यमवर्गीय घरातून आलेली सीमा, तिच्यासाठी अमेरिकन जीवनशैली स्वीकारणे इतके सहजसोपे नव्हते. इथे तिला सावरतो तिचा नवरा चंद्रशेखर, तोच तिला शिकवतो, प्रोत्साहन देतो आणि मग एक दिवस तिला जणु पंख फुटतात. तिच्या समोर आकाश अपुरे पडायला लागते. एका मर्यादेपर्यंत तो तिला समजावून सांगतो पण कालांतराने त्यालाही कंटाळा यायला लागतो. मग मन घट्ट करुन निर्णय घेतो, वेगळ्या वाटा निवडण्याचा. आपले प्रेम असलेल्या व्यक्ती पासून असे वेगळे होणे इतके सोपे असते का? त्याला भूतकाळ आठवतो. त्याला मुंबई आठवते. त्याची आई आठवते. त्याचे मैतर आठवतात. त्याचे बालपण आठवते. आयष्याचा भूतकाळ आठवता आठवता तो अखेरीस त्याचा वर्तमान स्वीकारतो. पुन्हा नव्या उमेदीने. माणसाला कधीकधी विचित्र चक्रव्यूहाला सामोरे जावे लागते. असाच एक तरुण कलेक्टर "चक्रव्यूह" मध्ये भेटतो. एका गावातील गरिब विरूद्ध श्रीमंत असा संघर्ष असलेली कथा. मनातून त्याला अनेकदा त्या गरिबांना मदत करावी वाटतेय पण त्याचे प्रशासकीय पद आणि त्याभोवती असलेली राजकीय मंडळी त्याला तसे करु देत नाहीत. त्याच्या मनाची हतबलता मन व्यथित करते. अनेकदा काही प्रमाणिक अधिकारी मनाच्या विरूद्ध जाऊन का वागतात? याची कल्पना इथे येऊन जाते. त्यामागे असलेली राजकीय इच्छाशक्ती. पण जनमानसात प्रतिमा मलिन फक्त त्या अधिकाऱ्याची होती. दोष फक्त त्याच्या कार्यपद्धतीला दिला जातो. त्याच्या आयुष्याचा चक्रव्यूह कधी कोणाला समजून घेता येईल का? समाजाच्या प्रस्थापित संकेतांना झुगारून आपल्या मनासारखं आयुष्य जगणारी यशोदाबाई आपल्याला "ओझं" मध्ये भेटते. व्यसनी नवरा गेल्यानंतर आलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देत, जिद्दीने आयुष्य जगणारी यशोदाबाई वाचताना तिच्या धाडसाचे कैातुक वाटते. गावातील एका तरुणा सोबत असलेली तिची मैत्री समाजातील प्रतिष्ठेला जेव्हा धक्का देते तेव्हा तिच्यातील बंडखोर स्री पेटुन उठते. पण उगाच प्रत्येकाला त्याचे स्पष्टीकरण देत बसण्याची तिला गरज वाटत नाही. तिने केलेल्या कृत्याचा ती पुरस्कार करते. इथे बोकील सरांची लेखणी कमाल करुन जाते. स्री पुरूष संबंधातील इतके सूक्ष्म निरीक्षण खुप कमी लेखक मांडतात. प्रेमभंग झालेली कित्येक लोकं आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो. काहीजण प्रेरणा घेऊन काहीतरी बनून दाखवतात तर काहीजण व्यसनाधीन होऊन देवदास बनू पाहतात. तर "लेमन ट्री" मधला नायक असाच प्रेरणा घेऊन जागतिक दर्जाचा कृषी संशोधक बनून भारतात आलाय. इथे त्याला भेटते पुर्वाश्रमीची त्याची प्रेयसी. कोणे एके काळी त्याचे निस्सिम प्रेम होते तिच्यावर पण तिने दिलेला नकार,तो अपमान. सारेकाही त्याच्या आठवणीत अगदी काल घडल्यासारखे सारखे ताजे आहे. व्हेन आय वाॅज जस्ट अ लॅड अाॅफ थ्री माय फादर सेड टु मी डोंच्यू फेल इन लव्ह माय बाॅय इट्स लाइक अ लेमन ट्री मधल्या काळात घडून गेलेले तिचे लग्न आणि अचानक अालेले तिचे वैधव्य. पुन्हा नव्या आयुष्याची घडी बसण्याकरिता तिची त्याच्यामागे चाललेली धडपड. त्याला सारे दिसत असते पण मनात कुठेतरी अपमानाचे कढ अजूनही ताजे असतात. त्याच्या मनाची घालमेल. मनात उचंबळून येणाऱ्या भावनांची कारंजी. प्रेमाची एक विलक्षण व्याख्या बोकील सर इथे सांगून जातात. तू प्रेम केलेस हा तुझा आनंद होता. त्यासाठी इतरांना आग्रह कशासाठी? संग्रहातील शेवटची कथा आहे, "उदकाचिया आर्ती". धरणग्रस्तांसाठी काम करणारी एक समाजसेविका. एका गावाचा संघर्ष आपल्या जमिनी,आपले गाव वाचवण्यासाठीचा. कथानक वाचत असताना नकळत तुमच्या डोळ्यांसमोर थोर समाजसेवीका मेधा पाटकरांचे व्यक्तीमत्व उभे राहते. सरांनी या कथेत रोहीणी नावाच्या व्यक्तीरेखेतुन कथानक उलगडून दाखवले आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करत असताना वैयक्तिक आयुष्याची कशी हेळसांड होते. तरीही स्वतःच्या इच्छांवर तुळशीपत्र ठेऊन समाजासाठीच जगणाऱ्या एक मनस्वी स्री चे मनोगत आहे या कथेमध्ये. आपण जगत असलेले कंफर्ट झोनमधील आयुष्य नक्कीच तुच्छ वाटू लागते तिच्या सेवाभावी वृत्तीपुढे.

- मंगेश रवींद्र वंजारी.


पुस्तक - उदकाचिया आर्ती

लेखक - मिलिंद बोकील


32 views1 comment